महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा आहे. सध्या महायुती 225 जागांवर तर महाविकास आघाडी 55 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागांवर आघाडीवर आहेत.
चित्र पुरेसं स्पष्ट आहे. 15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे.
अर्थातच, आता सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो मुख्यमंत्रिपदाचा. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रिपदी राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रिपद सोडणार का? देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवली जाणार की भाजप आपल्या पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करणार?
काहीतरी वेगळा धक्का म्हणून अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा वेगळा डाव महायुती टाकेल का?
सध्या ना-ना प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नेमकं कोण आहे आणि कुणाच्या हातात मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, याचा हा धांडोळा.
दोन्ही आघाड्यांमध्ये जाहीर केला नव्हता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा
खरं तर निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दोन्हीही आघाड्यांकडून जाहीर करण्यात आलेला नव्हता. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन मोठी धुसफूसही दिसून आली.
उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येण्यास उत्सुक होते खरे मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या उर्वरित दोन पक्षांनी तसं होऊ दिलं नाही.
महायुतीमधूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र, त्यांच्यामध्ये याबद्दलची धुसफूस निवडणुकीपूर्वी दिसून आली नाही.
यासंदर्भात बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात तीन शक्यता बोलून दाखवल्या.
ते म्हणाले की, “आताचे आकडे पाहता भाजपला स्वत:कडे मुख्यमंत्रिपद घेण्यामध्ये सध्या अडचण दिसत नाही. मात्र, पुढच्या काळात मुंबईसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकींना सामोरं जाण्यासाठी चेहरा नवीन आणायचा की आहे तोच चेहरा तात्पुरता ठेवून तो नंतर बदलायचा अशीही एक शक्यता आहे.
त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयातून येणं यासाठी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. दुसरी शक्यता म्हणजे फडणवीसांची ‘पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा पूर्ण करु देणे. तिसरी शक्यता म्हणजे भाजपचाच मुख्यमंत्री करायचा पण नवा चेहरा द्यायचा आणि फडणवीसांना केंद्रात घ्यायचं. यातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांपैकीच कुणीतरी एक मुख्यमंत्री होईल, असं मला वाटतं.”
कोण होणार मुख्यमंत्री आपल्याला प्रतिक्रिया कळवा
Leave a Reply